सेलूच्या प्रिन्स इंग्लिश स्कूलची तनिष्का तेलभरे राज्यात प्रथम
राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा : तनिष्काची राष्ट्रीयस्तरावर निवड
सेलू : सेलू तालुक्यातील एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे हिने राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे आणि सेलू तालुका, छत्रपती संभाजीनगर विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे. तनिष्का हिने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून आता राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विज्ञान मेळाव्यासाठी निवड निश्चित केली आहे.
नारायण चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्काने या स्पर्धेत सहभाग घेतला. तनिष्काला गायत्री पावडे हिची सोबत होती. तिने विज्ञानाच्या विविध पातळ्यांवर आपले कौशल्य सिद्ध केले. तालुका, जिल्हा आणि विभागीयस्तरावर सलग प्रथम क्रमांक पटकावत तनिष्काने आपल्या कौशल्याची झलक दाखवली होती. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिक्षणप्रणालीचे आणि तिच्या परिश्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. महाराष्ट्र राज्यातून एकमेव प्रिन्स इंग्लिश स्कूलची निवड होणे हे संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. तनिष्काचे हे यश संपूर्ण शाळेच्या आणि पालकांच्या मनात आनंद आणि गौरवाची भावना निर्माण करणारे आहे. या उल्लेखनीय यशावर संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना तनिष्का तेलभरे, गायत्री पावडे आणि तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळवणे हे शाळेसाठी अभिमानास्पद आहे. तनिष्काने घेतलेले प्रचंड परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच हे यश शक्य झाले आहे.” डॉ.रोडगे पुढे म्हणाले, “महाराष्ट्र राज्यातून एकमेव शाळा म्हणून आमची निवड झाल्याने आम्ही अतिशय गौरव अनुभवीत आहोत. आम्ही सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत आणि तनिष्काचे हे यश त्याचाच एक ठळक पुरावा आहे. आम्ही राष्ट्रीय स्तरावर देखील तिला आणखी मोठ्या यशाच्या शुभेच्छा देतो.” या राष्ट्रीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर तसेच शिक्षकवृंदांनी तनिष्काचे यश कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आहे आणि तिला पुढील राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.