Maratha Reservation : परभणी ‘जिल्हा बंद‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सरकार विरोधात सकल मराठा समाजाची घोषणाबाजी
परभणी : आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ रविवारी (२२ सप्टेंबर) परभणी जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला परभणी शहरासह पूर्णा, पालम, पाथरी, मानवत, सेलू, सोनपेठ तालुक्यात प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत राज्य सरकार चालढकल करीत असल्याने आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खराब झाली असून त्यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील बाजारपेठ देखील रविवारी कडकडीत बंद होती. या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पूर्णा शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातून मुख्य रस्त्यावरून सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा अध्यादेश पारित करावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. सेलू येथे दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यात देखील बंदला प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनासाठी सोमवारी (२३ सप्टेंबर) जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे.