परभणीसह जिंतूर, गंगाखेडमध्ये बंदला प्रतिसाद
सकल मराठा समाजाचा जिंतूरमध्ये मोर्चा
परभणी : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी जिंतूर बंदची हाक देण्यात आली होती. बंदला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, परभणी, गंगाखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
जिंतूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार राजेश सरोदे यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, हैदराबाद गॅजेटचा समावेश करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून, येलदरी रस्ता, मेन चौक, पोलीस ठाणे मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
परभणीत दुसऱ्यादिवशीही बंद
आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटे येथील उपोषणाला पाठिंबा म्हणून रविवारपाठोपाठ सोमवारी (२३ सप्टेंबर) सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली. परभणी येथे सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सकाळच्या सत्रातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्याने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, युवकांनी घोषणाबाजी करत शहरातून दुचाकीवर फेरी मारली. जिंतूर रोडवरील महाराणा प्रतापसिंह बसथांब्याजवळ काही युवकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. त्यावेळी नानलपेठ पोलिसांच्या पथकाने या युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेेले. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरांमध्ये चौका-चौकात पोलीस तैनात केले आहेत.