क्युरियस किड्स प्री स्कूल व फिनलंडच्या फिनिश एज्युकेशनमध्ये सामंजस्य करार
चेअरमन डॉ.संजय रोडगे यांची माहिती; विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण
परभणी : सॅनरो एज्युक्युअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित क्युरियस किड्स प्री स्कूल आणि फिनलंड येथील फिनिश एज्युकेशन यांच्यातील सामंजस्य करारावर दिल्ली येथे १९ सप्टेंबर रोजी आयोजित एका परिषदेदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली आहे. सॅनरो एज्युक्युअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित क्युरियस किड्स प्री स्कूलचे चेअरमन डॉ.संजय रोडगे यांनी ही माहिती दिली. या महत्त्वपूर्ण कराराच्यावेळी फिनलंड येथील शिक्षण विभागाच्या उच्च आयुक्त कार्यालयातील अधिकारी लिसा, मिला, स्टेला आदी उपस्थित होते. या करारानुसार क्युरियस किड्स प्री स्कूलला जगातील सर्वोत्तम फिनिश एज्युकेशनचे मान्यता प्रमाणपत्र प्राप्त होणार असून, त्याद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण व होमवर्क टास्क प्रदान केले जातील. ऑनलाइन प्रशिक्षण व्हिडिओद्वारे सादरिकरण केले जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने शिक्षण दिले जाईल. यासोबतच, पालक आणि शिक्षकांना फिनलँडच्या शिक्षण पद्धतीवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांमध्ये सुधारणा होईल. या करारामुळे क्युरियस किड्स प्री स्कूलला फिनलँडचा करिक्युलमदेखील उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल, असे डॉ.रोडगे यांनी सांगितले.