पिवळा मोझॅक (केवडा) : सोयाबीन पडले पिवळे; उताऱ्यात घट होण्याची चिंता
सेलू : कमी जास्त पावसामुळे पेरणी केलेले सोयाबीन पिवळा मोझॅकमुळे (केवडा)पिक पिवळे पडले असल्याने सोयाबीन उताऱ्या घट होण्याची शक्यता असून लावलेला खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे.
ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात कमी पर्जन्यमान झाले, तर सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे काढणी अगोदरच सोयाबीन पिक पिवळे पडले. सोयाबीन पिवळे पडल्यामुळे सोयाबीन शेंगा भरल्या नाहीत. पाऊस उघडल्यानंतर सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिवळे पडले. तीन चार वेळा फवारणी करूनसुद्धा काहीच उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोयाबीन पिकावर यलोमोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिवळे पडले असल्याने शेतक-यांना अपेक्षीत उतारा मिळत नाही. प्रतिवर्षी शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीना काही अडचणी येत असल्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे मुश्कील झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात कापूस पिकाखालोखाल सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. रोगाच्या जास्त प्रादुर्भावामुळे काही भागांत संपूर्ण पीक उपटून टाकण्याची वेळ आली होती.