मुस्लिम समाजाचे सेलूत जोरदार धरणे आंदोलन
रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध, कारवाई करण्याची मागणी
सेलू/परभणी : मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे रामगीरी महाराज व मुस्लिम समाजाच्या भावना भडकावणार्या आमदार नितेश राणे यांच्या विरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी मुस्लिम बांधवाच्या वतीने सेलू येथील तहसील कार्यालय परिसरात शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
दुपारी दोन ते पाच दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी सध्या देशात नेहमीच प्रयत्न होत असल्यामुळे अशा अपप्रवृत्तीच्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई करावी; तसेच रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या विरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, सरकार या विरूद्ध कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याने या निषेधार्थ तीव्र आंदोलन करावे लागत आहे.
परंतु सरकारने अद्यापही या प्रकरणी ठोस कारवाई केली नाही. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर युएपीए अंतर्गत कडक कारवाई करावी; तसेच प्रेषित मुहम्मद पैगंबर व इतर धर्मगुरूंबद्दल अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या विरूद्ध कडक कायदे करण्यात यावेत. यामध्ये कठोर शिक्षा देण्याची तरतुद करण्यात यावी; तसेच वक्फ संशोधन बिल २०२४ परत घेण्यात यावे. आदी मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्या मार्फत सरकारला देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दिपक बोरसे उपस्थित होते. निवेदनावर मौलाना खाजा अहमद कासमी, मुफ्ती बिलाल, मौलाना नसरुला, अब्दुल अजीज, मोहम्मद याहीया मोहम्मद अफजल, सय्यद इम्रान हाश्मी, पठाण सोहेल खान,जकियोदीन सिद्दीकी,शेख रहीम शेख गुलाम, रहीम खा पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. धरणे आंदोलन कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला.