कोल्हा-परतूर रस्ते कामाचे सेलूमध्ये भूमिपूजन
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत ३५५ कोटींचा निधी, ४४.५ किमीचा प्रशस्त सिमेंंट क्रॉंकिट रस्ता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत कोल्हा ते परतूर या रस्त्यामुळे मतदारसंघातील विकासाला अधिक गती मिळणार आहे. विरोधीपक्षात असतांनाही सेलू-जिंतूर मतदारसंघात ४०० कोटींचा निधीतून विविध कामे झाली आहेत. महायुतीच्या सरकारने भरघोस निधी दिला आहे. ३५२ किलोमीटर लांबीचे रस्ते,न्यायालय, पोलीस ठाणे, सा.बां. कार्यालय, विश्रामगृह या सरकारी इमारती, क्रीडांगण विकास आदींसह जाहीरनाम्यातील ९९ टक्के कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. उर्वरित कामेही पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा निश्चित संधी मिळणार, असा विश्वास आहे. – आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, सेलू-जिंतूर मतदारसंघ
सेलू/परभणी : आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा-तीन व केंद्रसरकारच्या सहाय्याने ३५५.२३ कोटी रुपयांच्या निधीतून परभणी आणि जालना जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख राज्य मार्ग क्र.२५३ वरील कोल्हा ते परतूर या ४४.५ किलोमीटर लांबीच्या सिमेंट क्राँकिट रस्ते कामाचे भूमिपूजन सेलू (जि.परभणी) येथे शुक्रवारी, ११ ऑक्टोबररोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर सचिव मनीषा म्हैसेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने उत्साहात पार पडले.
बांधकाम विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी खासदार संजय जाधव, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक तथा शासकीय कंत्राटदार रामप्रसाद घोडके, कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील, बळीराम माने, आर.बी.वाघमारे, संजय साडेगावकर, डॉ.संजय रोडगे, रणजीत गजमल, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, युवराज पौळ, रवींद्र डासाळकर, ॲड.दत्ताराव कदम, रामेश्वर राठी, शैलेश तोष्णीवाल, अनिल पवार, माऊली ताठे, विठ्ठल काळबांडे, भाऊ सोनवणे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की; कोल्हा-सेलू-सातोना-परतूर या रस्त्यामुळे सेलू, मानवत आणि परतूर तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कंत्राटदार रामप्रसाद घोडके यांच्याकडे हे काम असून दर्जेदार कामाची ओळख त्यांनी राज्यभरात निर्माण केलेली आहे, असे नमूद करून आपण विरोधीपक्षात असतांनादेखील विकासकामांना मोठा निधी खेचून आणला. खासदार जाधव यांचेही सहकार्य लाभले. निजामकालीन शाळांनी १०० कोटींचा निधी, सेलू एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांना प्रतिएकरी ४८ लाख मोबदला मंजूर करून घेतला आहे. सेलू १३२ केव्ही वीज उपकेंद्र, पन्नास खाटांचे महिला रुग्णालय आदीसह शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत विकासकामांवर भर देत प्रयत्न केले आहेत. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील यांनी, या ७ मीटर रुंदीच्या सिमेंट क्रॉंकिट रस्त्याच्या कामामध्ये सात मध्यम व एका नवीन मोठ्या पुलासह एकूण ३८ पुल उभारण्यात येणार आहे. दोन वर्षात मानकांप्रमाणे काम पूर्णत्वास जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यक्रमाला विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. सा.बां.अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
मतदारसंघाचा विकास करत असतांना, सत्ता कोणाची आहे. यापेक्षा सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकास करणे काळाची गरज आहे. सत्ता बदलत असते मात्र, जनतेला विकास अपेक्षित असल्याने विकासाकामांत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. रस्ते कामांबाबत आर.बी.घोडके यांचा दर्जा उत्कृष्ट आहे. कोल्हा ते परतूर रस्त्याचे कामही दर्जेदार होईल. रस्ते मार्गावरील गावातील नागिरकांना रस्ते कामांमुळे येणाऱ्या समस्या सोडविण्याकडे बांधकाम अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. जिल्ह्यातून जाणारा जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे पूर्णत्वास गेल्यास सहा तासांत मुंबईला जाण्याचा मार्ग सुकर होईल. – खासदार संजय जाधव, परभणी