आचारसंहितेचे काटकोर पालन करा
जिंतूरमध्ये एसडीओ प्रवीण फुलारी यांच्या सूचना
सेलू/परभणी : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वांनी प्रयत्न करावेत. सर्व मतदार नागरिकांनी मतदान अवश्य करावे तसेच निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणीही आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची दक्षता घ्यावी नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना उपविभागीय अधिकारी तथा ९५ जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिल्या आहेत.
श्री.फुलारी यांनी शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेची पाहणी केली. औंढा रोडवरील आयटीआय तसेच तहसील परिसरात निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावरील तयारीचा व कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. औंढा रोड परिसरात असलेले आयटीआय परिसरातील मतमोजणी केंद्र, तसेच तहसील परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या नियोजन, जिंतूर- सेलू परिसरातील चेक पोस्ट तसेच वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांचे मतदान जास्तीत जास्त कसे वाढवावे यासह अनेक बाबींवर बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. हसत खेळत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, असे आवाहन केले. बैठकीला जिंतूरचे तहसीलदार राजेश सरवदे, सेलूचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे, प्रशांत राखे आदींसह हनुमान बोरकर, रामेश्वर शिंदे, रुपेश वाहुळे, विश्वजीत खरात, अनिल आंबेराव अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.