निवडणूक प्रशिक्षण दिवाळी सुट्टीत नको
राष्ट्रवादी शिक्षक सेलची मागणी, निवडणूक आयुक्तांना निवेदन
परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी शाळेचा सरसकट स्टाफ घेऊ नका, ५० वर्षांवरील शिक्षक-शिक्षकेतरांचा वेगळा विचार करावा, आजारी, अपंग, गरोदर महिला कर्मचारी यांना निवडणूक कामातून मुक्त करावे. निवडणूक प्रशिक्षण दिवाळी सुट्टीत नको आदी विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्ष शिक्षक सेलच्या वतीने शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) निवडणूक आयुक्त यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याद्वारे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीचे काम हे राष्ट्रहिताचे काम आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत शिक्षकांची महत्वाची आणि मुख्य भूमिका असते. ते ती प्रामाणिकपणे पार पाडतात. पण या दरम्यान शिक्षकांना येत असलेल्या अडचणीकडे प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत असून, शिक्षक बंधूभगिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या संदर्भात गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा. शाळांमधील फक्त ३० टक्के स्टाफ घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अंशकालीन कर्मचारी व संगणक शिक्षक यांना निवडणुकीच्या कामात सहभागी करून घ्यावे व त्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा. बेरोजगार तरुणांना निवडणुकीची कामे द्यावीत, मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी शिक्षकांची जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रांवर राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी. बर्याचशा गावात मतदान केंद्रावर विजेची, पंख्याची व्यवस्था नसते त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर महिला कर्मचार्यांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यांचा गांभीर्याने विचार करून यावर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्ष शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, जिल्हाध्यक्ष जी.के.भुसारे, अ.भा.सोळंके, पी.बी.शेळके, एन.आर.सोनटक्के, आर.एम.भुरे, टी.एस.सुक्रे, व्ही.बी.जाधव यांच्या सह्या आहेत.