पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
सेलू : शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या निवासी शाळेत गुरूवारी, २४ ऑक्टोबररोजी पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्याध्यापिका सुनीता वेडे, गृहप्रमुख प्रेरणा पवार, कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर आदी उपस्थित होते. कला शिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी १०० विद्यार्थिनींना पर्यावरणाचे महत्त्व तसेच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कागदापासून विविध प्रकारचे छोटे छोटे आकाश कंदील कसे बनवायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. उपस्थित पूर्णवेळ शिक्षिका अश्विनी बोराडे, वनदेवी वाघमारे, शितल अवचार, अनुसया शिंदे, आम्रपाली कांबळे यांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवला. गृहप्रमुख प्रेरणा पवार यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी शिक्षिका सुमित्रा पवार, योजना कातकडे, बेबी केंद्रे, सुजाता सेलूकर, अनिता काळे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेतील मुलींनी बनविले आकाश कंदील
सेलू शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक किरण बोराडे, ज्ञानेश्वर पौळ, कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर, सहशिक्षक विजय सोंजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मंजुषा जगदाळे यांनी केले. पाटणकर यांनी कागदापासून विविध प्रकारचे छोटे छोटे आकाश कंदील कसे बनवायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. बालकांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवला. मुख्याध्यापिका सालेहा परवीन यांनी आभार मानले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी सहशिक्षिका अविद्या गाडे, रेशमा बेगम मंजूर, सय्यद रहिल्याबाजी, कमल काळे यांनी परिश्रम घेतले.