‘श्रीशिवप्रताप’ पारायण सेलूमध्ये उत्साहात; ग्रंथाची मोठी विक्री
गीता परिवाराचा उपक्रम : स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांची उपस्थिती
श्रीशिवप्रताप ग्रंथाची मोठी विक्री : सेलू येथील नूतन विद्यालयाच्या हनुमानगढ परिसरात आयोजित श्रीराम कथेदरम्यान स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रभु श्रीरामचंद्र यांची कलियुगातील दुसरी आवृत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीशिवप्रताप ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा. यामुळे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास कळणार आहे, असे नमूद करून श्रीशिवप्रताप ग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन कथेच्या सांगता प्रसंगी स्वामीजींनी केले. ग्रंथावर आपण स्वाक्षरी करणार असल्याचेही सांगितले. यामुळे बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी ग्रंथ घेण्यासाठी कथास्थळी स्टॉलवर सेलूकरांची उडी पडली. उपलब्ध ग्रंथाच्या सर्वच प्रतींची विक्री झाली.
सेलू/परभणी : सेलू येथील गीता परिवाराच्यावतीने श्रीसाईबाबा मंदिरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओवीबध्द जीवन चरित्रावरील ‘श्रीशिवप्रताप ग्रंथ’ पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीरामकथेच्या निमित्ताने शुक्रवारी, १८ ऑक्टोबरपासून सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या पारायणामध्ये १५० हून अधिक महिला, पुरूष सहभागी झाले होते. मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी पारायणाची सांगता झाली. सोमवारी स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी पारायण स्थळी भेट देऊन ‘श्रीशिवप्रताप’ ग्रंथाविषयी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्रीसाईबाबा मंदिराच्या वतीने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी स्वामीजींचे स्वागत केले. कथा आयोजक जयप्रकाश बिहाणी, साईराज बोराडे, प्रतिक बोराडे यांच्यासह गीता परिवारचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन, महेश खासगी बाजार समिती, बीबीसी उद्योगच्या संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या औलोकीक अशा जीवन कार्यावर आधारीत जालना येथील ग्रंथकार म्हाळासाकांत पाटील (राजा सिंदखेडकर) यांच्या लेखणीतून साकारलेला पहिला ओवीबध्द ‘ श्रीशिवप्रताप’ चरित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे आता पारायण करता येत आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. सूत्रसंचालन सतीश बाहेती यांनी केले. गीता परिवाराच्या वंदना मंत्री, उज्ज्वला सुजित मालाणी, रामवल्लभ राठी, सतीश बाहेती आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.