तरुणाच्या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवदान
जिंतूरमधील ब्रेनडेड विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचा निर्णय, ग्रीन कॉरिडॉरने अवयव रवाना
परभणी : चार दिवसांपूर्वी मेंदूमध्ये झालेल्या रक्तस्त्रावामुळे ब्रेनडेड झालेल्या १६ वर्षीय विद्यार्थी तरूणाच्या कुटूंबियांनी त्याच्या अवयवदानाच्या घेतलेल्या निर्णयामुळे तीन रूग्णांना जीवदान मिळाले. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ग्रीन कॉरीडॉरद्वारे ब्रेनडेड तरूणाच्या दोन किडनी व लिव्हर संभाजीनगर व नांदेड येथे तीन रूग्णांसाठी पाठविण्यात आले. यावेळी प्रशासकीय यंत्रणेने वेळेचे महत्व लक्षात घेवून सर्वतोपरी यंत्रणा सज्ज ठेवली होती.
याबाबत माहिती अशी, जिंतूर शहरातील सार्थक प्रवीण नवले (वय १६) हा ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता १२ वीचे शिक्षण घेत होता. २१ ऑक्टोंबर रोजी त्याच्या मेंदूत अचानक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला लगेचच परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथील तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्यानंतर ब्रेनडेड झाल्याचे निदान झाले.
याबाबतची माहिती कुटूंबियांना समजल्यानंतर मोठा धक्काच बसला. मात्र या धक्क्यातून सावरत नवले कुटूंबियांनी गरजु रूग्णांसाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची शासकीय प्रक्रिया लगेचच पूर्ण केली. शुक्रवारी सकाळीच शस्त्रक्रिया करून त्याचे अवयव गरजु रूग्णांसाठी नोंद असलेल्या ठिकाणी नेण्याचे निश्चीत करण्यात आले. त्यासाठी पुणे, संभाजीनगर व नांदेड येथून तज्ञांचे पथक येथील देवगिरी हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. पहाटेच शस्त्रक्रिया करून लिव्हर व दोन किडनी हे अवयव सुरक्षितरित्या ॲम्बुलन्सद्वारे नेण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यासाठी या मार्गावर ग्रीन कॉरीडॉर करण्यात आला.
संपूर्ण पोलिस प्रशासनाने वाहतूक या ॲम्बुलन्ससाठी नियंत्रीत केली होती. १ लिव्हर व १ किडनी घेवून एक ॲम्बुलन्स छत्रपती संभाजीनगरकडे तर दुसरी १ किडनी घेवून नांदेडकडे रवाना झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार, देवगिरी हॉस्पीटलच्या टिमचे प्रमुख डॉ. एकनाथ गबाळे, डॉ.अतुल जाधव, डॉ. राहुल टेंगसे, डॉ. अमिताभ कडतन, डॉ. मनोज सोनी, डॉ.श्रद्धा गबाळे, डॉ. विजय बोंडे यांच्यासह अवयवदान व देहदान चळवळीचे समन्वयक विनोद डावरे, विनोद गारूडी, राजु दराडे, अजहर शेख, संतोष घुले, दिनेश रेंगे, शेख साहिल, नामदेव काळे, शेख सुफियान आदी उपस्थित होते.