हदगाव तलावात पाणपक्ष्यांचा विहार
स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन अजून नाहीच
सेलू : दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच विदेशातून भारताच्या काना कोपऱ्यात पोहोचणारे पाणपक्षी अद्याप दिसत नसले, तरी कायम स्थानिक स्थलांतरित पक्षी मात्र हदगाव तलावात जलविहार करताना नजरेस पडत असल्याची माहिती पक्षीमित्र विजय ढाकणे व माधव गव्हाणे यांनी दिली.
शहरापासून सतोना रोडवर हदगाव पावडे गाव असून त्याच्या लगत मोठंमोठ्या खदानीमुळे पाणी जमा होऊन त्याचे तलाव तयार झाले आहेत. गावाच्या पूर्वेला अगदी लागून असलेल्या तलावात दरवर्षी अनेक स्थलांतरित पाणपक्षी मुक्त जलविहार करत असतात. तर वारकरी बदक, छोटी अडई, जांभळी पाणकोंबडी, हळदी कुंकू बदक आदी पाणपक्ष्यांनी याठिकाणी कायमस्वरूपी अधिवास केल्याचे पहावयास मिळत आहे. रविवार,२७ ऑक्टोबर रोजी शहरातील पक्षीमित्र विजय ढाकणे, माधव गव्हाणे, डॉ.नयन राठोड, अनया विजय ढाकणे यांनी या तलावावर पक्षीनिरीक्षण केले असता, वारकरी बदक मोठ्या संख्येने या ठिकाणी पहावयास मिळाले तर छोटी अडई, हळदी कुंकू बदक, सामान्य तूतवार, चांदिवाली मुनिया, तिरंगी मुनिया, सामान्य खंड्या, राखी बगळा, जांभळा बगळा, माळभिंगऱ्या, पानकोंबडी आदी पक्षी त्यांना निरीक्षण करता आले.
सेलू तालुक्यातील पाणथळ जागा शोधणार : विजय ढाकणे
यापूर्वी जिंतूर, परभणी तालुक्यातील विविध पाणथळ जागांचा शोध घेऊन त्याठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या पाणपक्ष्यांचे निरीक्षण केले आहे. जिल्ह्यातील पाणथळ जागी येणाऱ्या पाणपक्ष्यांची विषयसूची तयार करण्याच्या सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था काम करत आहे. त्यादृष्टीने सेलू तालुक्यातील पाणथळ जागांचा शोध घेऊन ह्या पक्ष्यांची सूची तयार करणार असल्याची माहिती विजय ढाकणे यांनी दिली.