सेलूतील कापूस खरेदी बीट तत्काळ सुरु करा
डॉ.संजय रोडगे : बाजार समिती संचालकांची मागणी; आंदोलनाचाही इशारा
सेलू /परभणी : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे अद्यापही कापूस खरेदी बीट सुरू झाले नाही, असा आरोप करीत कापूस खरेदी बीट तत्काळ सुरु करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा संचालक; तसेच बाजार समिती संचालकांनी केली आहे. या बाबत सोमवारी, ४ नोव्हेंबर रोजी बाजार समिती सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे. सेलूसह इतर तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीस पहिली पसंती देत आहेत. सेलूत सर्वात जास्त जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी असल्यामुळे कापसाला चांगला भाव मिळत आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदी बीट सुरू आहेत, परंतु सेलू येथील कापूस खरेदी बीट अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याची अडवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी कापूस खरेदी बीट तत्काळ सुरु करण्यात यावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संचालक डॉ. संजय रोडगे, शैलेश तोष्णीवाल, रामेश्वर राठी, ॲड.दत्तराव कदम, गोकर्णा पडघन, अनिल पवार, अनिता माऊली ताठे व वर्षा केशव सोळंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.