आमदार बोर्डीकर यांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहणार : डॉ.संजय रोडगे
डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या स्नेहसंमेलनात निर्धार
सेलू / परभणी : श्रीराम प्रतिष्ठान येथे आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन मंगळवारी, ५ नोव्हेंबररोजी करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला आहे, असे डॉ.संजय रोडगे यांनी नमूद केले.
याप्रसंगी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापरक अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे होते. यावेळी संचालक ॲड.दत्तराव कदम, प्रकाशबाप्पा गजमल, दीपक रोडगे, संजय गटकळ, बद्री ताठे, उद्धव खेडेकर, विष्णु महाराज पुरी, दत्तराव लाटे, उत्तमराव गजमल, विश्वनाथ गजमल, अशोकराव चाळके, गणेशराव काटकर, रामप्रसाद रोडगे, शिवाजीराव रोडगे, विलास रोडगे, सुनील रोडगे, प्रदीप रोडगे, बाळासाहेब लोंढे, दत्तराव ताठे, रमेशराव गायकवाड, दत्तराव गाते, रामा घोडके, बद्री बरसाले, गणेश सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, मागील पाच वर्षांमध्ये जिंतूर-सेलू मतदारसंघामध्ये साडेतीनशे कोटी रुपयांहून अधिक निधी आणून मतदारसंघांमध्ये सर्वच ठिकाणी विकासकामे हे उत्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. तसेच अद्यापही विकासकामे सुरू आहेत. या मतदारसंघाचा पूर्णपणे विकास करण्याचा माझा ध्यास आहे. मागील निवडणुकीपूर्वी जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या जाहीरनाम्यातील सर्वच कामे मी पूर्ण केलेले आहेत. तसेच जी कामे जाहीरनाम्यात नव्हती तीही कामे करण्यात आली आहेत. रवळगाव शिवारातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे. तो पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडला. परंतु पुढील संधी आपल्या मार्फत मिळाली, तर नक्कीच तो प्रथम प्राधान्याने पूर्ण करेल. तसेच कोविड काळामध्ये सामान्य जनतेला मी स्वतः तिथे जाऊन मदत केलेली आहे. जिंतूर-सेलू मतदार संघाचा महाराष्ट्रामध्ये विकास कामाच्या बाबतीत एक नंबरवर आणणार असल्याचा विश्वास या वेळी त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात डॉ.संजय रोडगे म्हणाले की, डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या वतीने स्नेहसंमेलन आयोजन करून एक प्रकारे विजयश्री खेचून आणण्याचे काम या माध्यमातून करणार आहे. रवळगाव जिल्हा परिषद सर्कल मधून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी मित्रमंडळाचे सर्वच पदाधिकारी तसेच कार्यकर्ते तन-मन-धनाने काम करतील. तसेच यावेळी सर्व जमलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार बोर्डीकर यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणणार अशी शपथ घेण्यात आली. या वेळी रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील रवळगाव, गोहेगाव, डासाळा, मालेटाकळी, शिंदेटाकळी, लाडनांद्रा, कुपटा, देवला पुनर्वसन, घोडके पिंपरी, बरसाले दिग्रस, दिग्रस वाडी येथील डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत मोगरे यांनी केले, तर संजय गटकळ यांनी आभार मानले.