विधानसभा निवडणूक : शरद पवार यांची आज सेलूमध्ये जाहीर सभा
दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सभा
सेलू /परभणी : जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय माणिकराव भांबळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांची सेलू (जि.परभणी) येथे शुक्रवारी, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ‘विजय संकल्प महासभा’ आयोजित करण्यात आली आहे.
नूतन विद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर ही सभा होणार असून महाविकास आघाडीच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस व घटक पक्षाचे आजी, माजी खासदार, आमदार, पदाधिकारी, नेते आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात मोठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. जिंतूर, सेलू मतदारसंघात शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा, गाठीभेटी घेऊन मतदारांना सभेचे निमंत्रण दिले जात आहे. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन उमेदवार विजय भांबळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, वसमत येथील सभेनंतर सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवर दुपारी दीड वाजता श्री पवार यांचे आगमन होणार आहे. सेलू येथील सभेला संबोधित केल्यानंतर ते घनसावंगी येथील सभेसाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.