विधानसभा निवडणूक : मातब्बरांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू 

विधानसभा निवडणूक : मातब्बरांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू 

जिंतूर,सेलू विधानसभा : बोर्डीकर, भांबळे, नागरे यांच्यात रंगणार सामना; १७ उमेदवार रिंगणात

सेलू/परभणी : परभणी जिल्ह्यातील ९५-जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विद्यमान आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे, कॉंग्रेसचे बंडखोर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. तीघाही मातब्बरांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.

राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. २०१९ च्या निवडणुकीव्दारे मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविलेल्या विद्यमान आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनाच भाजपने पुन्हा एकदा विश्वासाने मैदानात उतरविले आहे. संपूर्ण मतदारसंघात रेकार्डब्रेक विकास केल्याचा दावा करीत, बोर्डीकर यांनी समर्थकांच्या साथीने जबरदस्त फिल्डिंग लावून प्रचार सुरू केला आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा राजकीय करिष्मा; रस्त्यांसह विविध विकास कामे आणि महायुती सरकारच्या विविध योजना यांचा लेखाजोखा मांडत आणि ‘अविरत विकासाचे वचन’ देत बोर्डीकर यांनी दुसऱ्यांदा विधानसभा गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव यांना १२ हजार ६४५ मतांची आघाडी या मतदारसंघात मिळालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे विजय भांबळे यांनी, उमेदवारी निश्चित समजूनच, गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. २०१९ च्या निवडणुकीत ३७१७ मतांच्या फरकाने भांबळे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळी अनेक समर्थक जोडून विजयाची गणिते मांडत भांबळे यांनी अधिक सजगतेने ‘रामकृष्ण हरी…’ म्हणत प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. तर कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांनी बंडखोरीचा झेंडा हाती घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी पदरात पाडून घेत, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ‘आमचं ठरलंय’ चा इरादाही कायम ठेवलेला आहे. विविध समाज घटकांना जोडीत मोर्चेबांधणी आणि प्रचार यंत्रणेव्दारे परिवर्तन घडविण्यासाठी सज्जता सुरू केलेली आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी, संवाद दौऱ्याव्दारे थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. प्रचारादरम्यान मातब्बरांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या व्यतिरिक्त अन्य १४ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे होणारी मतविभागणी आणि जरांगे फॅक्टरचा फायदा, वा नुकसान यावरच मातब्बरांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

🔸रिंगणातील उमेदवार

अनिल चव्हाण (बहुजन समाज पार्टी), मेघना साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पार्टी), विजय भांबळे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), सुरेश नागरे (वंचित बहुजन आघाडी), डॉ.प्रभाकर बुधवंत (राष्ट्रीय समाज पक्ष), रमेश राठोड (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी), शेख सलिम शेख इब्राहिम ( ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत), सुभाष वाव्हळे (बहुजन रिपब्लिकन सोशलीस्ट पार्टी), अपक्ष उमेदवार – अच्युत कदम, अतुल अंभोरे, अमोल डंबाळे, राजीव पंचांगे, विजय  ठोंबरे, विनोद भवाळे, सय्यद रियाज , सुखदेव भांबळे, ज्ञानदेव दाभाडे.

🔸९५-जिंतूर,सेलू विधानसभा मतदार संख्या (३० ऑक्टोबर २०२४ नुसार)

पुरुष – २,००,२६२

स्त्री – १,८८,०२२

तृतीयपंथी – १०

सैन्य दलातील मतदार – ९४

एकूण – ३,८८,३८८

१८ ते १९ वयोगटातील मतदार – १०,२४१

🔸२०१९ विधानसभा निवडणूक निकाल –

१. मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर (भाजप) – १,१६,९१३ मते ( विजयी) ४५.४६ टक्के

२. विजय माणिकराव भांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) -१,१३,१९६ मते (४४.०२ टक्के)

– फरक – ३,७१७ मते


 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!