गंगाखेड विधानसभा मतदारसंघ : आमदार गुट्टे, कदम, घनदाट यांच्यात अटीतटीची लढाई

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ : आमदार गुट्टे, कदम, घनदाट यांच्यात अटीतटीची लढाई

अन्य पक्ष-अपक्षामुळे मोठ्या प्रमाणावर होणार मतविभागणी

बाबासाहेब हेलसकर


परभणी : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) उमेदवार विशाल कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार सीताराम घनदाट या मागील निवडणुकीतील दिग्गजांमध्येच पुन्हा रंगतदार सामना होत आहे.
शिवसेनेचे (उबाठा) विशाल कदम मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा दंड थोपाटून मैदानात उतरले आहेत. खासदार संजय जाधव यांनी आक्रमक प्रचारातून विद्यमान आमदार गुट्टे यांना आव्हान देत, कदम यांच्यामागे भक्कम पाठबळ उभे केले आहे, तर लोकसभा निवडणुकीत रासपचे महादेव जानकर यांना पाचपैकी केवळ गंगाखेड मतदारसंघातच ६,७११ मतांची आघाडी आमदार गुट्टे यांच्यामुळेच मिळू शकली होती. त्यामुळे गुट्टे यांनीही खासदार जाधव यांच्यावर पलटवार करीत पुन्हा जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या माजी आमदार घनदाट यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली. गेल्यावेळी घनदाट यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती आणि ५२,२४७ मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा तीनही दिग्गजांतील तुल्यबळ लढत लक्षवेधी ठरणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ४,२१,२७२ मतदार गंगाखेड मतदारसंघात आहे. गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यात विस्तीर्ण पसरलेल्या आणि ओबीसी, दलित, मुस्लिम बहुल अशा या मतदारसंघात जरांगे फॅक्टरचाही मोठा प्रभाव महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पक्ष-अपक्षांसह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मतविभागणीचा फटका कोणाला बसतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक निवडणुकीत असणारी धनुष्यबाण, पंजा, घड्याळ ही तीनही महत्वपूर्ण चिन्हे यावेळी मतपत्रिकेवरून गायब आहेत. मात्र, नवीन चिन्हे घेऊन दिग्गजांसह सर्वच उमेदवारांच्या रंगतदार प्रचाराने निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे.

▫️कळीचे मुद्दे

– गंगाखेड, पूर्णा, पालम तालुक्यातील एमआयडीसीचा विकास
– स्थानिक तरूणांना रोजगार
– प्रलंबित सौर उर्जा प्रकल्प
– डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पूर्ण क्षमतेने अडविण्यासाठी धानोरा काळे पुलाची उंची वाढविणे
– शिक्षण, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत विकास

▫️…यांच्या भवितव्याची लढाई

विशाल विजयकुमार कदम ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), रूपेश मनोहरराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),  रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी), विठ्ठल जिवनाजी रबदडे ( जनहित लोकशाही पार्टी), सीताराम घनदाट ( वंचित बहुजन आघाडी), अपक्ष उमेदवार अलका विठ्ठल साखरे, नामदेव रामचंद्र गायकवाड, विष्णुदास शिवाजी भोसले, विठ्ठल सोपान निरस, विशाल बालाजीराव कदम, ॲड.संजीव देवराव प्रधान

▫️विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

रत्नाकर गुट्टे (रासप) – ८१,१६९ (विजयी)

विशाल कदम (शिवसेना) – ६३,१११

सीताराम घनदाट (अपक्ष) – ५२,२४७

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!