विद्यार्थ्यांनो, खेळातूनही करिअर घडवा : डॉ.संजय रोडगे
सेलूत राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहात सुरूवात, राज्यभरातील ९०० खेळाडूंचा सहभाग
सेलू/परभणी : आपल्या देशामध्ये काही मोजकेच खेळ विद्यार्थी खेळतात. परंतु, वूशू सारख्या खेळामधूनही विद्यार्थी करिअर घडवू शकतात, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी जिल्हा वूशु असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) व्यक्त केले. महाराष्ट्र वुशू असोसिएशन आणि सेलू येथील एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित २१ वी जुनिअर व २२ वी जुनिअर युथ मुलामुलींच्या राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ.रोडगे बोलत होते.
१७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील ९०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनप्रसंगी प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे, एस.एस.कटके, गणेश कुटे, शैलेश तोष्णीवाल, ॲड.दत्तराव कदम, रवि डासाळकर, विशाल काला, प्रवीण काला, डॉ.अरविंद बोराडे, माणिकराव डख, आनंद मालाणी, मधुकारनाना पोळ, प्रफुल्ल विनायके, डॉ.कुंदन राऊत, संजय परताणी, अशोक पटवारी, गणेश माळवे, नागेश कान्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू संदीप शिलार, प्रतीक्षा शिंदे, श्रावणी कटके, सुरत सोनकांबळे यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डिगांबर टाके यांनी केले. तर आभार अशोक बोडके यांनी मांनले.