वयोवृद्धांसह दिव्यांगानी बजावला गृह मतदानाचा हक्क

वयोवृद्धांसह दिव्यांगानी बजावला गृह मतदानाचा हक्क

परभणी : जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चारही मतदार संघात गृह भेट मतदानाला सुरूवात झाली. निवडणूक विभागाने ८५ वर्ष व त्यापुढील वयोगटातील मतदार तसेच दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेबद्दल शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी समाधान व्यक्त करीत मतदानाचा हक्क बजावला. जिंतूर-सेलू मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनात विशेष नियुक्त पथकाद्वारे गृह मतदान प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून सुरु झाली.

पहिल्याच दिवशी ८८ वर्षीय महिलेने गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. परभणी जिल्ह्यात ४ नोव्हेंबर २०२४ च्या माहितीनुसार ८५ वर्षावरील एकूण १९४९, तर दिव्यांग २२४ मतदारांनी गृह मतदानासाठी अर्ज भरून दिलेला होता. त्याप्रमाणे विशेष पथकाव्दारे मतदारांच्या घरी जाऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेतले जात आहे. यामध्ये जिंतूर मतदारसंघातील ९०१, परभणी २५४, गंगाखेड ४१०, तर पाथरी मतदारसंघातील ६०८ मतदारांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी मतदारांच्या घरी !

परभणी विधानसभा मतदारसंघात गुरूवारी गृहभेट मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. स्वत: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातील प्रभावतीनगर येथील रहिवासी कमलाकर कातनेश्वरकर (वय ९३) व कुसुम कमलाकर कातनेश्वरकर (वय ८७) यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. धर्मापुरी येथील दिव्यांग मतदार माधव प्रभाकर कदम यांचेही मतदान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी मतदारांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, गणेश चव्हाण, विकास आगलावे व गृहभेट मतदान पथक हजर होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!