मंत्रीपदाचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केला विश्वास
जिंतूर/ परभणी : गेली पंचेवीस आपण आमदार होतो. जनतेच्या आशीर्वादाने सगळे काही आजवर मिळालेले आहे. आज वयाची ७२ वर्ष ओलांडली आहेत. फक्त एकच अपेक्षा आपण सातत्याने बोलून दाखवलेली आहे. एका टर्ममध्ये आमदार झालेले मंत्री मी पाहीलेत. पण या वेळी लेकीचा (आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर) मंत्रिपदाचा हट्ट आणि माझे स्वप्न निश्चितच पूर्ण होणार आहे, असा विश्वास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.
जिंतूर शहरात बुधवारी (२३ नोव्हेंबर) आमदार बोर्डीकर यांची जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने आयोजित आभाराच्या सभेत श्री. बोर्डीकर बोलत होते. या वेळी आमदार बोर्डीकर, भावना बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, सुरेश भुमरे, डॉ.संजय रोडगे आदींची उपस्थिती होती.
श्री बोर्डीकर म्हणाले, की या निवडणुकीत महाराष्ट्रात वेगवेगळे फतवे निघाले, पण महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे स्थापन होत आहे. जिंतूरमध्ये सेलू तालुका आल्यानंतर मतदारसंघातील मराठा मते वाढली. पण जिंतूर तालुक्यात वीस-पंचवीस हजारच मराठा मते असतांना या तालुक्यातील जनतेने मला २५ वर्षे आमदार केले. या ऋणाची जाणीव आहे. विरोधकांनी पसरविलेल्या अफवांना ओबीसी बांधवांनी या निवडणुकीत मोठी चपराक दिली आहे, असेही बोर्डीकर म्हणाले.
आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, जनतेने दुसऱ्यांदा आमदार करून जो विश्वास दाखवला. त्याबद्दल आभार. ज्या पद्धतीने गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करत आले. तसेच यापुढेही कुठे कमी पडू देणार नाही. उलट अपेक्षेपेक्षा जास्त काम करून दाखविणार, अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली. दरम्यान, ‘तुमचे कारनामे आता बंद करा, ही बोर्डीकरांची लेक जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही, ” असा टोला आमदार बोर्डीकर यांनी यावेळी विरोधकांना लगावला. या वेळी सचिन गोरे, प्रताप देशमुख, गोविंद थिटे, विद्याताई चौधरी, सुनील भोंबे, अभिजित पारवे, संगीता जाधव, शिवाजी कदम, गजानन चौधरी, ओंकार चौधरी, दिनकर चौधरी आदींसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.