सेलूकरांचा विश्वास सार्थ ठरविणार

सेलूकरांचा विश्वास सार्थ ठरविणार

आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांची ग्वाही, सेलूमध्ये विजयी मिरवणूक जल्लोषात

सेलू : जिंतूर-सेलू विधानसभा  मतदारसंघाच्या या निवडणुकीत जातीपातीचे समीकरण आणि ध्रुवीकरणाचे मोठे प्रयत्न झाले. अनेक फॅक्टर होते. परंतु माझ्या विजयासाठी जिंतूर पाठोपाठ विशेषतः सेलू शहरातील तरूणांचे, जनतेचे मोठे सहकार्य लाभले. सेलूतून चार हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे सेलूकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे, अशी ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी या वेळी भावना व्यक्त करतांना दिली.

सेलू शहरात बुधवारी (२३ नोव्हेंबर) आमदार बोर्डीकर यांची जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने आयोजित आभाराच्या सभेत आमदार बोर्डीकर बोलत होत्या. जिंतूर शहरातील मिरवणूक आणि आभार आटोपल्यानंतर आमदार बोर्डीकर यांची सेलू शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने बोर्डीकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सात वाजता वाजतगाजत बोर्डीकर यांची विजय मिरवणूूक काढण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ रात्री दहा वाजता समारोप झाला.

आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, जनतेने दुसऱ्यांदा आमदार करून जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार. हा विश्वास कधीही कमी होऊ देणार नाही. ज्या पद्धतीने गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करत आले. यापुढेही कुठे कमी पडू देणार नाही. माझ्या विजयासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जीवाचे रान केले. आणि विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाला फोडून काढले. म्हणून खर्‍या अर्थाने महायुतीचे भाजप सरकार सत्तेवर आरूढ होत आहे. नेहमी सत्याचा विजय होतो. हेही निकालाने दाखवून दिले आहे. आमदार करून चूक केल्याची जाणीव तुम्हाला कधीही होऊ देणार नाही. उलट अपेक्षेपेक्षा जास्त काम करून दाखविणार. सर्वांचे समाधान आणि प्रत्येकाला मानसन्मान देणार, असेही बोर्डीकर यांनी सांगितले. मिरवणुकीत पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!