National Science Seminar -2024 : सेलूच्या प्रिन्स इंग्लिश स्कूलची ‘तनिष्का’ उपविजेती
राष्ट्रीय विज्ञान सेमिनारमध्ये यशस्वी सहभाग
सेलू/ परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे हीने राष्ट्रीय विज्ञान संगोष्ठी-२०२४ (नॅशनल सायन्स सेमिनार ) मध्ये उपविजेतेपद पटकावले आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स आयोजित हा सेमिनार मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्र येथे पार पडला. यामध्ये
“कृत्रिम बुद्धिमत्ता – संभाव्यता व सरोकार” या विषयावर आयोजित स्पर्धेत भारतभरातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम परीक्षा, नंतर प्रस्तुतीकरण आणि शेवटी प्रश्नोत्तरे या तीन टप्प्यांतील स्पर्धेत तनिष्काने उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले.
यासाठी तनिष्काला शिक्षक प्रा.नारायण चौरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉ.संजय रोडगे यांनी तनिष्काने कठोर परिश्रम आणि निष्ठेने शाळेचे नाव उंचावले या बद्दल कौतुक केले. विशेष म्हणजे, मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांना विशेष स्नेह भोजन देऊन आनंद साजरा केला.
या यशाबद्दल तनिष्का तसेच पालक अनंत तेलभरे यांचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे,सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.