मने सुन्न करणारी दुर्देवी घटना : पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या
गंगाखेड येथील रेल्वे रूळावर आढळून आले छिन्नविछिन्न मृतदेह, कारण अद्यापही अस्पष्ट
गंगाखेड/परभणी : गंगाखेड येथील एका विद्यालयातील मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४५) या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गुरुवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका मालगाडीसमोर एका ओळींना झोपून आत्महत्या केली. हृदय पिळवटून टाकणार्या या घटनेने कित्येकांची मने सुन्न झाली. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलावर या शिक्षकासह पत्नी व मुलीने रेल्वे मार्गावर झोपून जीवनयात्रा संपवली.
शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा उर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. त्या तीघांचे मृतदेह घटनास्थळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याबरोबर प्रत्यक्षदर्शनींनी ती गोष्ट तत्काळ पोलिसांना कळविली. उपविभागीय अधिकारी दिलीप टिप्परसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आसेफ शेख, जमादार दिपक वावळे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेवून ओळख पटविण्याचे काम सुरु केले. तेव्हा खिशात सापडलेल्या मोबाईलवरुन समोरच्या व्यक्तीस संपर्क केल्यानंतर आत्महत्या केलेल्यापैकी व्यक्तीची ओळख पटली. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली असून, या कुटुंबियांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, तो शिक्षक अहमदपुर तालुक्यातील किनीकद्दु या गावचा मूळ रहिवाशी असून गंगाखेड येथील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात ते मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते, अशीही माहिती समोर आली आहे.