बीएसएफ जवान परशुराम यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
धर्मापुरीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम
परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या धर्मापुरी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी परशुराम मुरलीधर केजभट यांची नुकतीच सीमा सशस्त्र दलामध्ये (बीएसएफ) नियुक्ती झाली. यानिमित्ताने सोमवारी (९ डिसेंबर) आयोजित कार्यक्रमात केजभट यांनी ज्ञानसाधनाच्या विविध घटक संस्थातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्या हस्ते परशुराम केजभट यांचा सत्कार करण्यात आला. सचिव तथा प्राचार्य शितल सोनटक्के यांची उपस्थिती होती.
केजभट यांनी आपल्या जुन्या आठवणी उजाळा देत, यशापर्यंत झालेला प्रवास अत्यंत दिलखुलासपणे विद्यार्थ्यांसमोर मांडला. ज्ञानसाधना प्रतिष्ठानमधील शिस्त व योग्य शिक्षण पद्धतीमुळे आपण कसे घडलो व अल्पवयातच आपले ध्येय कसे गाठले, हे सांगताना त्यांनी आपल्या वसतीगृहातील आठवणी सांगितल्या. आदर्श विद्यार्थी घडविण्याची व त्याच्या सर्वांगीण विकासाची पूर्ण तयारी ज्ञानसाधनामध्ये केली जाते, असे नमूद केले. स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सुद्धा अत्यंत सोप्या शब्दांमध्ये सांगितले. विद्यार्थ्यांनी जिद्द व सातत्याने प्रयत्न करून यश संपादन केले पाहिजे, असा संदेश दिला. संस्थेच्या वर्ग पाचवी ते दहावी सेमी व नीट विभाग, तसेच अकरावी व बारावी नीट,जेईई विभाग, पब्लिक स्कूल, बळीराजा युनिट व फार्मसी महाविद्यालय अशा सर्व शाखेला भेट दिली. समन्वयक एन.पी.खपरले यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला सर्व समन्वयक, प्राचार्य, विभागप्रमुख ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.