संविधान प्रतिकृतीच्या अवमानाचा परभणीमध्ये प्रयत्न
‘तो’ माथेफिरु पोलिसांद्वारे ताब्यात, शांतता राखण्याचे जिल्हा व पोलिस प्रशासनाचे आवाहन, ठिकठिकाणी निषेध
परभणी : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा एका माथेफिरुने मंगळवारी,१० डिसेंबर रोजी सायंकाळी अवमान करण्याचा प्रयत्न केला. त्या माथेफिरुस प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ ताब्यात घेवून चोप दिला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले. परंतु, सुज्ञ पदाधिकारी व नागरीकांनी व पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. पोलिसांनी त्या माथेफिरुची कसून चौकशी सुरु केली होती. त्या दरम्यान शहरात काहीशा अफवा पसरल्या. पाठोपाठ व्यापार्यांनी तात्काळ आपआपले व्यवहार बंद केले. दरम्यान, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस यंत्रणेने केले आहे.
ठिकठिकाणी निषेध
या प्रकारानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. घटनेनंतर परभणीमध्ये रेल्वेगाडी रोकण्याचा प्रयत्न करण्यात आला मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासनाने शांततेचे आवाहन केले आहे.तर जिल्ह्यात ठिकठिकाणाच्या डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळनंतर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकही जमले होते.
जिल्हाधिकार्यांनी केले शांततेचे आवाहन
परभणी : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची काच मंगळवारी सायंकाळी फोडल्याबद्दल पोलिसांनी एका माथेफिरुस ताब्यात घेतले असून त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणात कोणीही अफवा पसरवू नयेत, कायदा व सुव्यवस्था हातात घेवू नये, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी एका व्हिडीओ क्लिपद्वारे केले आहे.