दोन्ही खासदारांच्या ‘त्या’ वक्तव्यांची चौकशी करावी
आमदार मेघना बोर्डीकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या हिंसाचाराला सकल हिंदू समाजास जबाबदार धरणारे वक्तव्य खासदार संजय जाधव आणि खासदार फौजिया खान यांनी केल्याचा आरोप आमदार मेघना बोर्डीकर यांनी गुरूवारी, १२ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी डॉ.केदार खटींग, भाजपा महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, मंगल मुदगलकर, आनंद बनसोडे, बाळासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.
आमदार बोर्डीकर यांनी सांगितले की, बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मानवी हक्क दिनी १० डिसेंबरला जिल्हाभरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. परभणीतील मोर्चाचा समारोप दुपारी १२:३० पर्यंत झाला. दुपारनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार घडला. ते कृत्य करणार्या आरोपीला पोलिसांनी लगेच अटकही केली. या घटनेनंतर जमावाने रोष व्यक्त केल्यानंतर व्यापार्यांनी त्यांची भावना समजून घेत बाजारपेठ बंद केली. दुसर्या दिवशी देखील बंदला व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासून शांततेत बंद सुरू होता. मात्र दुपारनंतर काही समाजकंटकांनी जाणिवपूर्वक दगडफेक, जाळपोळ करून हिंसाचार घडवला. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे.
परभणीचे खा.जाधव आणि राज्यसभा सदस्या श्रीमती खान यांनी या घटनेबाबत केलेले वक्तव्य जातीय तेढ वाढविणारे आहे. सकल हिंंदू मोर्चा यशस्वी झाल्याचे त्यांना देखवले नाही म्हणूनच त्यांनी याकडे बोट दाखवल्याचा आरोप आ.बोर्डीकर यांनी केला. संवैधानिक पदावरील व्यक्तींनी दिल्लीत बसून असे वक्तव्य करणे चुकीचे असून त्यांनी माफी मागावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी. तसेच संविधान प्रतिकृतीचा अवमान करण्यामागचा सूत्रधार कोण आहे? याचाही शोध घ्यावा, अशी मागणी आ.बोर्डीकर यांनी केली आहे.