व्यापार्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा
आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची घेतली भेट
परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेच्या तोडफोडीची घटना निश्चितच दुर्देवी आहे. त्या घटनेतील आरोपींविरोधात कठोर भूमिका घ्यावी, त्याचबरोबर बुधवारी, ११ डिसेंबर रोजी काहींनी व्यापारीपेठांमधून केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनेत मोठा तडाखा बसलेल्या व्यापार्यांच्या नुकसानीचे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत, तसेच तोडफोड व जाळपोळ करणार्या समाजकंटकांवर लवकरात लवकर ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.
आमदार बोर्डीकर यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहनही करण्यात आले आहे, असे गावडे यांनी नमूद केले. यावेळी आमदार बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त व्यापार्यांचे तत्काळ पंचनामे करावेत, वेगवेगळ्या घटनांमधील समाजकंटकांची ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील देशमुख, रितेश जैन, माजी नगरसेविका मंगल मुदगलकर, राहुल कनकदंडे, सुशील शर्मा आदी उपस्थित होते.