श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज यात्रा : श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

 श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज यात्रा : श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

सेलूमध्ये शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद, आज पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा

 श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज यात्रा : श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

सेलू/परभणी : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२३ व्या यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता शनिवारी, १४ डिसेंबर रोजी महाप्रसादाने झाली. या वेळी शेकडो भाविकांनी श्री दत्तजयंतीनिमित्ताने दर्शन, महाप्रसादासाठी गर्दी केली होती.

रविवारपासून (८ डिसेंबर) भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीमधून श्रीमद् भागवत कथा निरूपण झाले. सांगताप्रसंगी महाप्रसादाचे यजमान माजी जिल्हा परिषद सभापती अशोकनाना काकडे व शिलाताई काकडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन, महाआरती झाली. गोंदीकर महाराज, श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे वंशज लक्ष्मीकांतराव सुभेदार रामराव सुभेदार तसेच विश्वस्त पुजारी केशवराव मंडलिक, वामनराव मंडलिक यांचा काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रामराव सुभेदार, प्रल्हाद कान्हेकर यांनी श्री काकडे यांचा सत्कार केला. अशोकनाना आणि शिलाताई काकडे यांनी मनोगत व्यक्त केले,

सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. आरतीनंतर दहा हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महोत्सवानिमित्त बालासाहेब महाराज नेब, शंकर महाराज आजेगावकर, पुरुषोत्तम महाराज वालुरकर, वसंतबुवा मंडलिक यांचे कीर्तन झाले. अखंड हरिनाम सप्ताह, भजन, लघुरुद्र व पवमान अभिषेक, श्री गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, केशवराज बाबासाहेब महाराजांचे ओवीबद्ध चरित्र पाठ, श्रीमद् भगवद्गीता पठन आदी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. १५ डिसेंबर यात्रेचा मुख्य दिवस असून, यानिमित्त दुपारी बारा वाजता महाआरती, महाप्रसाद  आहे. दुपारी तीन वाजता ‘श्रीं’ च्या पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होणार आहे‌. १६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता भागवतकार सुनील महाराज आष्टीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे‌. मंदिर संस्थान, यात्रा कमिटी तसेच सेलूतील व्यापारी मंडळी परिश्रम घेत आहेत.

दोन आठवडे फुलणार यात्रा

यात्रेच्या निमित्ताने व्यापार वर्गाने विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. मनोरंजक, साहसी खेळ, आकाश पाळणे, बच्चे कंपनीसाठी विविध खेळणी, क्रॉकरी, गृहोपयोगी वस्तू, महिलांसाठीच्या इमिटेशन ज्वेलरी, सजावटीची साहित्य, कापड, भांडी आदी विविध प्रकाराच्या दुकानांनी यात्रा भरली आहे. दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांच्या गर्दीने आगामी दोन आठवडे यात्रा फुलणार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!