आमदार बोर्डीकर घेणार मंत्रीपदाची शपथ !
महत्वाच्या खात्याची जबाबदारी; भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते नागपूरकडे रवाना
सेलू /परभणी : मंत्रिमंडळाचा शपथविधी काही तासांवर येऊन ठेपला असतांना, कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. कोणालाही थेट निरोप न मिळाल्याने मंत्रिमंडळात नक्की कोणाची वर्णी लागणार, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत, असे असतांना जिंतूर, सेलू वासिय आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यावासियांसाठी आज रविवारी, १५ डिसेंबररोजी सकाळीच आनंदांची बातमी हाती आली आहे. जिंतूर-सेलूच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर ह्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून यंदा धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये युवा, तरुण चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचे समजते. यामुळेच दुसऱ्यांदा विजयी ठरलेल्या आमदार मेघना बोर्डीकर यांना ही संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, सायंकाळी बोर्डीकर मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तसेच आमदार बोर्डीकर यांच्यावर ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते अशीही माहिती आहे.