मेघना बोर्डीकरांच्या मंत्रीपदाचा जिंतूर, सेलूत जल्लोष
राज्याची मंत्री म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली आहे. महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनात मंत्रीपदाच्या संधीचे आणि जबाबदारीचे सोने करून दाखविणार आहे. जिंतूर-सेलू मतदारसंघासह परभणी जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासोबतच शेतकरी, कष्टकरी, तरूण, महिला, बेरोजगार, व्यापारी आदींसह सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. शिक्षण, आरोग्य, सिंचन, मूलभूत सोयीसुविधांसह मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेषही भरून काढण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. – आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
सेलू/परभणी : जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर यांनी रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बोर्डीकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिंतूर, सेलू शहरासह परिसरात फटाक्याची जोरदार आतषबाजी करीत आणि एकमेकांना मिठाई भरवून भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही धुमधडाक्यात दिवाळी साजरी करून आनंदाचा जल्लोष केला.
मंत्री मेघना बोर्डीकर यांनी, २०१९ नंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. महायुतीच्या जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी बोर्डीकर ह्या एकमेव भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सादर करण्याच्या प्रस्तावाला बोर्डीकर यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे, बोर्डीकर यांना मंत्रिपदी संधी मिळू शकते, अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येत होती. बोर्डीकर आणि भाजपच्या नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. बोर्डीकर यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा ३० वर्षांपासून जिंतूरसह परभणी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूीवरही बोर्डीकर यांनी लेकीची मंत्रीमंडळात वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर रविवारी मेघना बोर्डीकर यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडून राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. ४० वर्षानंतर जिंतूरला आणि १४ वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपंद मिळाले आहे. याचा आनंददोत्सव जिंतूर, सेलू शहरासह जिल्हाभरात साजरा केला जात आहे.