न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू

न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू

घटनेनंतर बससेवेसह परभणी शहरातील बाजारपेठ बंद

परभणी : परभणी शहरात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या एका आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असताना रविवारी, १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या आरोपीस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहरातील बहुतांश भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली.

मृत आरोपीचे नाव सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी (वय ३५ वर्ष, रा.शंकर नगर, परभणी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर ११ डिसेंबर रोजी नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची रवानगी कारागृहात केली होती. या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मृऊ घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने नागरिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला.

या घटनेची माहिती पसरताच बाजारपेठ बंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात जमा झालेले लोकप्रतिनिधी, समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधला. युवकाच्या मृत्युची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. मृत्यू संशयास्पद आहे. फॉरेन्सीक तपासणी करून इनकॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी यावेळी आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांनी केले. दरम्यान घटनेनंतर परभणी आगारातून सुटणाऱ्या सर्व मार्गावरील बसेस अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!