खासदार राहुल गांधी सोमवारी परभणीत
स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार
परभणी : परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात झालेला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे सोमवारी (२३ डिसेंबर) दुपारी परभणी दौर्यावर येणार आहेत.
नवी दिल्ली येथून श्री.गांधी हे विशेष विमानाने सोमवारी दुपारी एक वाजता नांदेडला दाखल होणार असून तेथून ते १.१५ वाजता मोटारीने दुपारी २.४५ वाजता परभणीत दाखल होणार आहेत. नवा मोंढा येथील स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार असून तेथून ३.३० वाजता ते लगेच नांदेडकडे प्रयाण करणार आहेत. नांदेडहून ते ५.१५ वाजता विशेष विमानाने दिल्लीस रवाना होणार आहेत.