विभागीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी परभणीमध्ये
हेलस सानेगुरूजी कथामाला आणि मानस फाऊंडेशनचा उपक्रम, मंगळवारी जिजाऊ ज्ञानतीर्थमध्ये कार्यक्रम
परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस ता.मंठा जि.जालना आणि मानस फाउंडेशन, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा-२०२४ ची विभागीय अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ, पाथरी रोड, डेंटल कॉलेजच्या बाजूला या ठिकाणी मंगळवारी, २४ डिसेंबररोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पूज्य साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कथाकथन स्पर्धेच्या जिल्हाफेरीत मराठवाड्यातील एकूण ३१७ स्पर्धकांनी बालगट व किशोर गटात सहभाग नोंदविला होता. त्यातील एकूण १४ स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. अंतिम फेरीतील विजेत्यांना मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या वेळी परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) सुनील पोलास, जिजाऊ ज्ञानतीर्थचे मुख्याध्यापक तथा सचिव नितीन लोहट, मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेकर, जिजाऊ ज्ञानतीर्थचे अध्यक्ष रामरावजी लोहट, कोषाध्यश्र उषाताई लोहट, सानेगुरुजी कथामाला जालना जिल्हाध्यक्ष डॉ.सुहास सदाव्रते, कार्याध्यक्ष आर.आर.जोशी आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन सानेगुरुजी कथामाला हेलसच्या अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर आणि संयोजन समितीने केले आहे.