सेलूतील व्यंकूशाहांची यात्रा हाऊसफुल्ल
विविध वस्तू खरेदीसाठी महिलांची गर्दी; मनोरंजनासह खवय्यांना मेजवानी
संत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांची यात्रा हा सेलू शहराचा एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जोपासण्यासाठी व्यापारी मंडळी, यात्रा कमिटी, नवी पिढी पुढाकार घेत आहे. पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी आणि यात्रेसाठी गर्दी आहे. शहराचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा सेलूकरांनी जपली आहे. – विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष, सेलू जि.परभणी
बाबासाहेब हेलसकर
सेलू/परभणी : सेलू शहराचे ग्रामदैवत आणि संत श्री साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२५ व्या यात्रा महोत्सवानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून यात्रेकरूंची मोठी गर्दी उसळली आहे. विविध दुकाने तसेच साहसी खेळाची ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत.
शनिवारचा आठवडे बाजार आणि रविवार असल्याने गर्दीत अधिकच भर पडली होती. सेलूच्या पंचक्रोशीसह मंठा, परतूर, जिंतूर, पाथरी, मानवत तालुक्यातील भाविकही दर्शनासाठी; तसेच खरेदीसाठी यात्रेला येत असतात. यात्रेमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील यात्रेकरूंची विशेषतः दुपारी, तर शहर व आसपासच्या गावातील यात्रेकरूंची सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी दिसून येत आहे.
प्रसादासाठीच्या गुळ, साखर, तिळाच्या रेवड्या, फुटाणे यासह, मालकुवा, गुळ साखरेची शेव, विविध प्रकारचा चिवडा आदींची लहान मोठी दुकाने लागली आहेत. पावभाजी, चायनीज पदार्थ, पाणी पुरी, मिसळ, मसाला दोसा, भजी, जिलेबी आदी स्टॉलवर खवय्यांची गर्दी आहे. क्रॉकरी, भांडी, कापड, गृह सजावट शो च्या वस्तू, पर्स, बॅग, श्रृंगार, इमिटेशन ज्वेलरी व गृहपयोगी साहित्याच्या दुकानांवर महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. लहान मुलांची खेळणी, लाकडी, प्लास्टिक वस्तू, चप्पल व संक्रांत वाणांच्या दुकानांवर; तसेच आकाश पाळणे, झुला, ब्रेक डान्स आदी मनोरंजक खेळांच्या ठिकाणीही मोठी गर्दी उसळली आहे. ड्रॅगन रेल्वे, बोटिंग, जंपिंग, मिकी माऊस, मेरी गो राऊंड खेळण्यासाठी बच्चे कंपनीची गर्दी आहे. आठवडाभर यात्रेचा आनंद घेण्यासाठी यात्रेकरू गर्दी करतील
पोलिस बंदोबस्तात वाढ
गर्दीचा फायदा घेऊन टुकार टोळक्यांकडून चित्र विचित्र आवाज काढणे, ओरडून हुल्लडबाजी करणे यामुळे जेष्ठ नागरिक, महिला यात्रेकरूंना विनाकारण त्रास होत आहे. तसेच यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी मध्यंतरी डल्ला मारण्याचे प्रकार घडले. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं पोलिसांनी दोन महिला चोरट्यांना ताब्यात घेतले. वाढती गर्दी पाहता
सेलू पोलीस प्रशासनाने पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांसह बंदोबस्तात वाढ केली आहे.