येथे का रे उभा श्रीराम…
पंडित कैवल्यकुमाराच्या गायकीने श्रोते मंत्रमुग्ध, हरिभाऊ चारठाणकर संगीत समारोहाची सांगता
सेलू/परभणी : सेलू येथील दोन दिवसीय संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत समारोहात रविवारी किराणा घराण्याचे पंडित कैवल्यकुमार गुरव (धारवाड) यांनी सादर केलेल्या ‘शूरा मी वंदिले’ नाट्यगीतात ‘केदार ‘च्या कणस्वरांची केलेली पेरणी आणि संत रामदासांचा “येथे का रे उभा श्रीराम” अभंगाच्या शास्त्रशुद्ध गायकीने श्रोते मंत्रमुग्ध मुग्ध झाले. तबलावादक अनिरुद्ध देशपांडे, तर हार्मोनियम वादक शांतीभुषण देशपांडे या चारठाणकर बंधूंनी समर्थपणे साथसंगत करीत मैफल एका उंचीवर पोहचविली.
संगीत समारोहाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी झाले. या प्रसंगी गोविंदभाऊ जोशी, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, डॉ.रामराव रोडगे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, यशवंत चारठाणकर, नंदकुमार परताणी, ॲड.लक्ष्मीकांत सुभेदार, संयोजक महेशराव खारकर आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील महागामी गुरूकुलाच्या विद्यार्थिनीने शितल भांबरे,सिद्धी सोनटक्के, राधिका बॅनर्जी,प्रतिमा तुपे यांनी शास्त्रीय नृत्य, पं.बिरजूमहाराजांची रचना, झपतालाचे लक्षणगीत, ईशीता अतूल कुळकर्णी हीने आपली कला सादर केली. पुण्याचा यती भागवत यांचे तबला सोलो वादन झाले. यश खडकेनी साथसंगत केली. यशस्वी सरपोतदार(पुणे) यांच्या गायनाने सांगता झाली.
रविवारी भेंडीबजार घराण्याचे युवाकलावंत उस्ताद विलायतखान यांच्या परंपरेतील सतारवादक मेहताबअली नियाजी यांच्या वादनाने सांगता झाली. त्यांनी यांनी सादर केलेल्या पंजाबी धूनला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तबलावादक स्वप्निल भीसे सोबत त्यांची जुगलबंदी मैफलीची उत्कटता वाढविणारी होती. प्रा.कृष्णराज लव्हेकर यांच्या गायनाने सुरुवात झाली. साथसंगत डॉ.प्रशांत जोशी सावरगांवकर(तबला) शांतीभुषण चारठाणकर (हार्मोनियम) यांनी केली. संगीत समारोहासाठी महेश खारकर, मल्हारीकांत देशमुख, श्रीकांत उमरीकर, प्रा.किशोर विश्वामित्रे, अजित मंडलिक, मोहन खापरखुंटीकर आदींसह संयोजन समितीने पुढाकार घेतला.