रौप्यमहोत्सवी स्व.नितीन चषक क्रिकेट स्पर्धा : सेलूमध्ये खेळपट्टीचे भूमिपूजन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १५ जानेवारीपासून स्पर्धा, खेळाडूंसह प्रेक्षकांनाही पारितोषिके
सेलू : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नितीन व्यायामशाळा, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने १५ जानेवारीपासून आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या नितीन चषक क्रिकेट स्पर्धेच्या खेळपट्टीचे भूमिपूजन रविवारी, ५ जानेवारी रोजी झाले.
या वेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने म्हणाले की, क्रिकेट स्पर्धेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत असून सर्वांच्या सहकार्याच्या तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाच्या बळावरच स्पर्धेची ही वाटचाल चालू आहे. या स्पर्धेच्या नियोजनाबाबत विशेष सहकार्य केलेल्या कै. गिरीष लोडया यांची आठवण मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने नेहमीच होते. या वर्षी रौप्यमहोत्सवी महोत्सवी साजरे होत असून स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात येणाऱ्या १६ संघांपैकी मराठवाड्यातील ८ तर बाहेरील ८ नामवंत संघाचा समावेश राहणार आहे. केवळ ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्यातील कला गुणांना वाव देता यावा व तालुक्यातील क्रीडाप्रेमींना चांगल्या स्पर्धा पहावयास मिळाव्यात हा स्पर्धा सुरू करण्यामागील उद्देश आहे. त्यासाठी सर्वांनी बहुमोल असे सहकार्य केल्यामुळेच गेल्या २५ वर्षांपासून स्पर्धेचे सातत्य त्याच उत्साहात टिकून आहे.”
१५ ते २३ जानेवारी या दरम्यान या स्पर्धा संपन्न होणार असून अनेक मान्यवर यामध्ये उपस्थिती लावणार आहेत. या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने होते. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, डॉ, बाळासाहेब जाधव, डॉ.अशोक नाईकनवरे, डॉ.ज्ञानेश्वर कारके, ॲड. शिवाजी चौरे, अरिहांत गॅस एजन्सीचे पारस काला, अप्पू सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.नागेश कान्हेकर यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. गणेश माळवे यांनी आभार मानले. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य व संदीप लहाने मित्र मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
खेळाडूंसह प्रेक्षकांनाही पारितोषिके
विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक २ लाख रुपये व चषक असून, द्वितीय १ लाख रुपये व चषक आहे. तसेच मालिकावीरला २१ हजार रुपयाचे परितोषिक राहणार आहे. दररोज मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन , बेस्ट क्षेत्ररक्षण अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहे. यावर्षीच्या स्पर्धेत विशेष पारितोषिक प्रेक्षकांसाठीही ठेवण्यात आले असून दररोज एका प्रेक्षकाला ड्रॉद्वारे एक सायकल दिली जाणार आहे. या स्पर्धा ड्रेस कोड मध्ये खेळवल्या जाणार असून टीमची निवास व भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.