सेलू शहरात भव्य क्रिकेट स्टेडियम उभारणार
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्वाही
सेलू/परभणी : सेलू शहरात मराठवाड्यातील सुसज्ज दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडीयम उभारणार असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी दिली आहे. सेलू येथे आयोजित रौप्यमहोत्सवी स्व.नितिन लहाने चषक क्रिकेट स्पर्धेला मंत्री बोर्डीकर यांनी भेट दिली.
मंडळाच्या वतीने राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ लहाने, सचिव संदिप लहाने, डॉ.संजय रोडगे, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, अशोक अंभोरे, कपिल फुलारी, शिवहरी शेवाळे,अशोक सेलवाडीकर, पांडूरंग गजमल, पोलीस उपनिरिक्षक माधव लोकूलवार, भागवत दळवे, बाबा काटकर, अविनाश शेरे, पांडूरंग कावळे, गजानन गात आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोबत चर्चा करून सेलू शहरात माजी उपनगराध्यक्ष संदिप लहाने हे स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करणार आहेत. या जागेवर सुसज्ज क्रिकेटचे स्टेडियम उभारून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल. याबाबत बीसीसीआयचे सचिव आमदार अशिष शेलार यांच्याची चर्चा करणार असल्याचेही या वेळी बोर्डीकर यांनी सांगितले. स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.