प्राचार्य द.रा.कुलकर्णी : स्मृतिगंधाचा अक्षरयात्री
सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून द.रा.कुलकर्णी यांनी सलग २५ वर्ष प्रदीर्घ काळ समर्थपणे धुरा सांभाळली. प्राचार्य व पुढे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस आणि विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. अनेकविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी ते गौरान्वित आहेत. नूतन महाविद्यालयाच्या ‘प्रेरणा’ वार्षिकांकापासून त्यांनी सुरू केलेला प्रासंगिक, स्फूट लेखनचा प्रवास सेवानिवृत्तीनंतर टप्प्याटप्प्याने ग्रंथरूपाने सर्वांसमोर आला. वाचनाचा प्रचंड व्यासंग, सुसुंवाद, प्रकटीकरणाचे देणं लाभलेल्या ‘द.रा.’ यांनी, वाढत्या वयासोबत आठवणींनाही साठविलेले आहे. त्याला अक्षररूप देत कायम सकारात्मक उर्जेचे वितरण केले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीही या अक्षरयात्रीचा अक्षरयज्ञ सुरू आहे. २२ जानेवारी २०२५ रोजी त्यांचे ९३ व्या वर्षात पदार्पण होत आहे. याचे औचित्य साधून नूतन महाविद्यालयाच्या माजी कर्मचाऱ्यांच्या आठवणींचा समावेश असलेल्या ‘स्मृतिगंध’ या ग्रंथाचे प्रकाशन सेलू येथे होत आहे. या निमित्ताने प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या अलिकेडच्या काळात प्रकाशित काही ग्रंथांचा, त्यांच्या भावनांचा अल्पसा आढावा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.
मागे वळून पाहतांना : आपल्या अनुभवाच्या शिदोरीचा गरजूंना अल्पसा उपयोग व्हावा, यात धन्यता मानून पत्नी दुर्गाताई कुलकर्णी आणि अनेक सन्मित्रांच्या आग्रहाखातर वयाच्या ८२ व्या वर्षी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी ‘मागे वळून पाहतांना’ या शैक्षणिक आत्मकथनात्मक ग्रंथाचे लेखन केले. बहात्तरी पानांच्या या छोट्याशा आत्मकथनात ‘अगदी बोट धरून चालतांना’ पासून ते नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या प्रयत्न त्यांनी केला आहे. माजी विद्यार्थी आणि लेखक आसाराम लोमटे यांची ‘मूर्तिमंत आदर्शाचा ‘दरा’रा ! ‘ ही समर्पक प्रस्तावना ‘द.रा ‘ सरांच्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाचा आलेख सर्वांसमोर उभा करते.
मैत्र विचारांचे : १४ एप्रिल २०१६ रोजी ‘मैत्र विचारांचे’ हा प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांचा डॉ.गंगाधर गळगे संपादित ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथामध्ये ‘द.रा.’ सरांनी प्रसंगानुरूप केलेले व्यक्तपरिचय, शैक्षणिक व अन्य लेखनाचा समावेश आहे. ” मी काही लेखक नाही. प्रतिभावंत नाही. सारस्वताचा सेवक नाही. फक्त जीवनावर प्रेम असलेला श्रद्धाळू ! गत आठवणींना उजाळा देण्याचा यामागे हेतू आहे.” असे या ग्रंथाच्या मनोगतात त्यांनी नम्रपणे नमूद केले आहे. हैदराबाद मुक्ती लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ, अनंतराव भालेराव, दलितमित्र श्रीरामजी भांगडिया, विनायकराव चारठाणकर यांच्यापासून गोविंदाव देशमुख, सोनाजी कुलकर्णी, शंकरराव मंडलिक, त्र्यंबक महाजन यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे लेख तसेच शैक्षणिक, सामाजिक चिंतनात्मक लेख, नरेंद्र चपळगावकर, प्रा.प्रकाश कामतीकर, प्रा.विश्वास वसेकर आदींसह अन्य काही जणांनी ‘द.रा.’ सरांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू यामध्ये मांडले आहेत. प्रभाकर बागले यांनी प्रस्तावनेतून ‘द.रा. यांच्या कार्याचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
निमित्त : पत्नी स्व.दुर्गाताई कुलकर्णी यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जुलै २०२३ मध्ये प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी ‘मागे वळून पाहतांना’ या आत्मकथनाला आणखी विस्तारितपणे ‘निमित्त’ या ग्रंथाच्या रूपाने वाचकांसमोर आणले. यामध्ये वाचनात आलेले विविध चिंतनात्मक लेख, आत्मकथन, गौरव ग्रंथ या वरील चिंतन मांडले आहे. शिवाय औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे शताब्दी वर्ष, मला घडविणारे शिक्षक, वैचारिक जडणघडण, शिस्तीप्रियता, वक्तशीरपणा, हैदराबाद मुक्तीसंग्रामात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे योगदान आदींबाबत आठवणींना उजाळा दिला आहे.
ऋणानुबंध : १६ एप्रिल २०२२ रोजी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांचा ‘ऋणानुबंध’ ग्रंथ प्रकाशित झाला. ” हा छोटा ग्रंथ मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगळ्या व्यक्ती आणि त्यांच्या सोहळ्याप्रसंगी केलेल्या स्फूट लेखांचा संग्रह असून त्याचा प्रारंभ नूतन महाविद्यालयाच्या ‘प्रेरणा’ या वार्षिकांकापासून झाला. प्राचार्यांच्या मनोगतामध्ये तत्कालीन प्रसंग, प्रश्न, त्यांची उकल आणि या संबंधीचे एक पानी मनोगत असे. माझ्या २५ वर्षांच्या प्राचार्यपदाच्या शेवटच्या काळांत महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव आणि माझ्या प्राचार्यपदाचा २५ वर्षांचा कालखंड या संबंधीचे समारोपाचे माझे मनोगत या ग्रंथांत समाविष्ट आहे. तसेच आमच्या संस्थेच्या संस्थापकापैकी काही व्यक्तिच्या पंचाहत्तरीनिमित्त किंवा सन्मान आणि गौरव सोहळे, विविध पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्यांवर लेख आले. माझ्या जडणघडणीत त्यांचा बहुमोल वाटा आहे.”, असे या ग्रंथाच्या मनोगतातून त्यांनी स्पष्ट केले आहे. या ग्रंथाची प्रस्तावना प्राचार्य डॉ.जनार्दन वाघमारे यांची आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘ऋणानुबंध’ मार्गदर्शक ठरणार असल्याचे डॉ.वाघमारे यांनी त्यात म्हटले आहे.
स्मृतिगंध : २२ जानेवारी २०२५ रोजी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘स्मृतिगंध’ या संपादित ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. यामध्ये नूतन महाविद्यालयातील एकूण ३२ माजी कर्मचाऱ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव तथा माजी प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या मार्गदर्शनात, माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.यु.सी.राठोड, गौतम सूर्यवंशी आदींसह संपादक मंडळाने यांचे संपादन केले आहे. या ग्रंथात संस्थापक प्राचार्य म्हणून द.रा.कुलकर्णी यांनी मांडलेली भूमिका तसेच ‘ध्येयपूर्तीची अखंड यात्रा’ यामधून संपूर्ण शैक्षणिक वाटचालीवर मांडलेले चिंतनात्मक लेखन तसेच माजी प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आठवणी संस्मरणीय आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील (नांदेड) माजी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. केशव सखाराम देशमुख (पुणे) यांनी या ग्रंथाविषयी नमूद करतांना म्हटले आहे की, स्मृतिगंध दरवळत ठेवणारा या ग्रंथातील प्रत्येक लेख जसा आस्थेने भिजलेला आहे तद्वतच, अनुभवांच्या कृतार्थ शिदोरींचाही एक नवा गंध इथे अनुभवास येणारा आहे. संस्था आणि ज्ञान यासंबंधीचा कृतज्ञताभाव चंदनाचा झरा होऊन या ग्रंथाचे पान आणि पान पुण्यवंत करणाराच ! गंध लेवून आलेल्या या सर्व आठवणींना माझ्या अनेक सदिच्छा !
प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित ‘वेलू गेला गगनावरी’ गौरव ग्रंथ ; तसेच पत्नी दुर्गाताई कुलकर्णी यांच्यावरील ‘जिणे गंगौघाचे पाणी’ या स्मृतिग्रंथासह पिंपळगावकर-कुटुंब व वंशविस्तार, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण, हीरक व अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित स्मरणिकांतून प्रासंगिक लेखन केले. मात्र, वयाच्या ८२ ते ९२ या काळातील त्यांचा ग्रंथ लेखनाचा ध्यास कैक पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरक ठरणारा आहे.
– बाबासाहेब हेलसकर, सहाय्यक शिक्षक, नूतन विद्यालय, सेलू जि.परभणी ९८८१५२५५१०