संजय गांधी निराधार अनुदान योजना : पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत
समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांचे आवाहन
सेलू : राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी यांना अर्थसहाय्य वितरण माहे जानेवारी २०२५ पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे स्तरावरुन डि.बी.टी.पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सेलू तहसील कार्यालयात संबधित विभागात सादर करावीत असे अवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे.
तालूक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी यांनी आधारकार्ड, बँकेशी संलग्न मोबाईल नंबर, बँक पासबुक, सदर लाभार्थी ह्यात आहे किंवा नाही याबाबत हयात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी बाबतचे आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित गावातील तलाठी किंवा संबंधित तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावीत. तसेच आधार कार्ड अदयावत करून घ्यावे. ज्या लाभार्थी यांनी वरील कागदपत्र सादर केली नाहीत त्यांचे निवृत्ती वेतन माहे फेब्रुवारी २०२५ पासून शासन स्तरावरुन अदा करण्यात येणार नाही. अशा सूचना असल्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनांचे अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभार्थ्यांनी त्यांचे आधार संलग्नीकृत बाँक खात्यात (DBT) पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थी यांनी वरील आवश्यक ती कागदपत्रे संबंधित गावातील तलाठी किवा तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करण्यात यावेत. तसेच अपंग, परित्यक्ता, विधवा यांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह नविन प्रस्ताव अर्ज सादर करावेत असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले.