जागतिक हस्ताक्षर दिन : नूतन विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू : सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे. संगणक आणि मोबाईलच्या युगात ही कला जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुंदर हस्ताक्षरातून व्यक्तिमत्त्व घडत असते, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती सेलू व कल्याणम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरुवारी, २३ जानेवारी रोजी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला नूतन विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या अक्षरप्रेमी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी श्री देशपांडे बोलत होते. संयोजक बाबासाहेब हेलसकर, राजेंद्र सोनवणे, बाळू बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या विजेत्यांना शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व कल्याणम एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने रोख रक्कम व सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे, असे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, कल्याणम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कळविले आहे.