‘फिरते तारांगण’ ने उलगडले खगोलीय रहस्य !
सेलूच्या नूतन विद्यालयात पोलाद स्टील कंपनीचा उपक्रम
सेलू : विद्यार्थ्यांना खगोलीय गुढ रहस्यांचा अनुभव देणाऱ्या ‘फिरत्या तारांगण’ उपक्रमाचे आयोजन नूतन विद्यालयात शनिवारी, २५ जानेवारी रोजी करण्यात आले होते. पोलाद स्टील कंपनीच्या या अभिनव प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राच्या अभ्यासात नवीन दृष्टीकोन मिळाला. हवा भरून तयार करण्यात आलेल्या डोमच्या आत, अत्याधुनिक फिशआय लेन्स आणि उच्च गुणवत्तेच्या प्रोजेक्टरच्या सहाय्याने, तारे, ग्रहे, उपग्रहे आणि आकाशगंगेतील अद्भुत दृश्ये दाखवण्यात आली. अभ्यासक्रमावर आधारित या प्रकल्पामुळे क्लिष्ट खगोलीय बाबी समजण्यात सोप्या झाल्या. या उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड वाढवण्यासाठी असे उपक्रम खूपच उपयुक्त ठरतात. अशा उपक्रमांनी विज्ञान शिक्षण अधिक प्रभावी होते.”
पोलाद स्टील कंपनीचे संचालक नितीन काबरा यांनी सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थ्याला तारांगणाचा अनुभव घेता यावा, यासाठी फिरते तारांगण गावागावांत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.” उपक्रमाच्या यशस्वितेसाठी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे, पर्यवेक्षक आर. एस. मोगल, सामाजिक शास्त्र विभागप्रमुख सु.ल.जोशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पोलाद स्टील कंपनीचे सुमित दुबे, अजित इंजे, निखिल देवगावकर व त्यांचे सहकारी भगवान मनगटे, महादेव माने यांनी उपक्रमासाठी मोलाचे योगदान राहिले. विद्यार्थ्यांना या अनुभवाने खगोलशास्त्रात अधिक रुची निर्माण होईल, अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.