जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात 

परभणी : परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक, शेतकरी, महिला, तरुण, आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते रविवारी परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे पार पडले. यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. मला खात्री आहे की, आपल्या जिल्ह्यात हा कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाईल. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे नमूद करून राज्यशासन पुरस्कृत योजने अंतर्गत मागील तीन वर्षांत झालेल्या अनुदाना वाटपाची सविस्तर माहिती दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री सौर कृषी पंप व कुसुम घटक योजनेतंर्गत परभणी जिल्हयातील ९ हजार ८८२ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेऊन आपले कृषी उत्पन्न वाढवावे. परभणी जिल्हयात रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्त संकलनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅबचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात रुग्णांना ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी इत्यादी सुविधा मोफत मिळणार आहे. सेलू येथे ५० बेडचे नवीन स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे. लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होईल. जिल्ह्यात सुमारे ५ लाख ४७ हजार लाभार्थ्यांना ई-हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. मागील वर्षात या विभागाने वसुलीचे शंभर टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ॲग्रिस्टॅक योजनेची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी ६३५ पथकांची गावनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री म्हणाल्या की, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हयाचा औद्योगिक विकास साधण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या औद्योगिक समूह विकास योजनेतंर्गत सेलू येथे केशवराज कॉटन क्लस्टर सुरु झाले आहे. १८५ लघुउद्योजकांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु केला आहे. महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. समाजातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जातीच्या एकूण ३ हजार १०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ येथे ६ वसतीगृह सुरु करण्यात आले आहेत. रमाई आवास योजने अंतर्गत २४ हजार ९७९ लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी नव्याने रुपये १२३ कोटींची प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळालेली आहे. लवकरच सुविधा निर्मितीचे कामे पूर्ण करण्यात येईल. पुर्णा, जिंतूर, सेलू व गंगाखेड येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत” शासकीय व खाजगी आस्थापनांवर सुमारे १ हजार ७४४ रूजू झाले आहेत. “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा”मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक हजार ५९४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये १२ कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सन २०२३-२४ अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील ४ हजार ४०३ लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तर मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत इतर व विशेष मागास प्रवर्गातील १३ हजार ५९६ लाभार्थींना मान्यता देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव सक्रीय असते. आपल्या जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापूरी, जवाहर नवोदय विद्यालय, गांधी विद्यालय, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक वाहन, श्वान पथक, दंगा नियत्रंण पथक, अग्निशमन दल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे पथक संचलनात सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते सन २०२३-२४ जिल्हा क्रीडा पुरस्कार, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान, सन २०२४-२५ या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!