बाल विद्याविहार प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे : ॲड.विलास पोहंडूळकर
परभणी : विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो, त्याला जसे घडवले तसा तो घडतो.आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे गतिमानतेचे युग असून विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाचे,कवायतीचे व शिस्तीचे कौतुक करत देशभक्तीचे बीज हे मुलांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते हे नमूद करतांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असल्याचे मत ॲड.विलास पोहंडूळकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.विद्या विहार शाळा अंबिका नगर,परभणीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगात बोलतांना व्यक्त केले.
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.विलास पोहंडूळकर यांच्या हस्ते करण्यात आले.स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभानंतर मुलांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी शाळेचा परिसर दणाणून गेला होता.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या वतीने मुलांनी तयार केलेल्या देशभक्तीवर आधारित भिक्तिपत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होमी भाभा स्पर्धेसह विविध स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल इयत्ता पाचवी अ ची विद्यार्थिनी कु.सानवी राम चिंचणे हिचा सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र,रोख रक्कम 701रु बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी छोट्यांसह मोठ्या बाल दोस्तांनी आपल्या गोड आवाजात प्रजासत्ताक दिनाची माहिती आपल्या भाषणातून दिली.शालेय क्रीडा दिनाच्या निमित्ताने भव्य पथसंचलन क्रीडाशिक्षक श्री आदित्य सर व सौ शुभांगी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांद्वारे परेडसह करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती कुलकर्णी तर आभार सौ.मंजुषा कुलकर्णी यांनी मानले.या प्रसंगी माजी विद्यार्थी, पालक वर्ग व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थित होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.