सेलूतील साईबाबा बॅंकेला अकराव्यांदा बँको पुरस्कार
संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्यासह संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सन्मानित
सेलू/परभणी : राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणाऱ्या सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला सलग अकराव्यांदा बँको पुरस्काराने मंगळवारी, २८ जानेवारी रोजी लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले.
अविज पब्लिकेशन आणि गॅलक्सी इग्मा (पुणे) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आरबीआयचे निवृत्त अधिकारी भारगेश्वर बॅनर्जी, बॅंको संचालक अशोक नाईक, अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रामराव लाडाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी संचालक राजेंद्र आडळकर, कन्हैयालाल बालचंदानी, दत्तात्रय आंधळे, सुभाष चव्हाण, ॲड.भगवान शिरसाठ, शेख इम्रान, गंगाधर आडळकर, सुनील आडळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे कठीण निकषांच्या आधारे माहिती घेऊन परिक्षण केले जाते. या सर्व निकषात साईबाबा बँक पात्र ठरली आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, मानवत, वालूर, जितूर, बोरी या सहा शाखेतून बंँक काम करत आहे. सर्वच शाखा सुसज्ज व संगणीकृत असून ग्राहकांना सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी दिल्या जातात. पुरस्काराबद्दल संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.