पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी घेतली आढावा बैठक

पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी घेतली आढावा बैठक

  • जिंतूर नगरपालिका कार्यालयात पालकमंत्री मदत केंद्राचे उद्घाटन

  •  घंटागाड्यांची संख्या वाढणार

  • कंत्राटी कर्मचाऱ्यातही होणार वाढ

जिंतूर : जिंतूर नगरपरिषदेमध्ये मागील दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने परिणामी सक्षम अधिकाऱ्याची उणीव असल्याने नागरिकांचे असंख्य  प्रश्न प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूर नगरपरिषदेची आढावा बैठक घेतली.

बैठकीत शहरातील होणाऱ्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विशेषत: घरकुल योजनेचे थकीत हप्ते, आठवडी बाजार,  पाण्याची समस्या व शहरातील स्वच्छता, दिवाबत्ती आदी मुद्द्यावर आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने पालकमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे.

बैठकीला उपस्थित नागरिकांनी शहरातील विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये विशेषता नाली, गटार साफसफाई, शहरातील धुळीचे साम्राज्य, उपलब्ध असलेल्या घंटागाड्याचा तुटवडा, साफसफाई कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या, शहरातील रस्त्यावरील वाढलेले बेसुमार अतिक्रमण या सर्व प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्यात येईल, या बाबत मेघना बोर्डीकर यांनी आश्वस्त केले.

शहरातील अग्निशामकदल कार्यालय, अग्निशामक वाहनाची व्यवस्था, नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध करून देणे, खेळासाठी मैदान उपलब्ध करून देणे, शहरातील काही आवश्यक भागात भुयारी गटार योजना व शहरासाठी अतिरिक्त पाणीपुरवठा तसेच ईदगाह परिसरात नवीन टाक्या सुरू करणे,  आठवडी बाजार जागेची समस्या आदी आवश्यक विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रभारी मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे व आवश्यक असलेली आपली नळपट्टी व घरपट्टीची थकबाकी नगरपालिकाला भरून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या वेळी बैठकीत केले.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, प्रताप देशमुख, डॉ.पंडित दराडे, भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे, शहराध्यक्ष किशोर जाधव, सरपंच शिवाजी काळे, माजी नगरसेवक गोपाळ रोकडे, संचालक रमण तोष्णीवाल, गोविंद दायमा,अधिकारी तुपसमिंद्रे आदींची उपस्थिती होती. या वेळी पालकमंत्री बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!