वालूर ग्रामपंचायत सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे धाव
ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द प्रकरण : संजय साडेगावकर यांनी दाखल केले अपील
सेलू : सेलू (जि.परभणी ) तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतचे सदस्य संजय साडेगावकर यांनी ग्रा.पं. क्षेत्रात स्वतःच्या मूळ जागेत शासकीय जागा ताब्यात घेत अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व अनर्ह ठरविण्यात येत असल्याचा निकाल ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला. आता या प्रकरणात संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे धाव घेत मंगळवारी, ४ फेब्रुवारीरोजी अपिल दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वालूर ग्रा.पं. मधील सदस्य लिंबाजी कोपणवार, धारुजी धाबे, सतीश कलाल, चंद्रकांत चौधरी, गोरखनाथ भालेराव, नागरिक वाहेद खाँ पठाण, दादामिया कुरेशी या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सरपंच संजय साडेगावकर व कुटुंबातील सदस्यांविरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार केली होती. परंतु, तक्रारदाराकडे पुरावे नसल्याने हा अर्ज २० जानेवारी २०२३ रोजी निकाली काढण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदारांनी अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपिल केले. त्यानंतर हे प्रकरण फेरचौकशीसाठी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले.
दरम्यान सेलू गटविकास अधिकारी यांनी वालूर ग्रा.पं. क्षेत्रात मोजणी केली तेव्हा जिपचे माजी सभापती संजय साडेगावकर यांनी स्वतः व कुटुंबातील सदस्यांची नावे असलेल्या तीन ठिकाणच्या स्वतःच्या मूळ जागेचे क्षेत्र आहे. त्यापेक्षा ते अधिकचे भरले, असा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला. हा अहवाल ग्राह्य धरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ३० जानेवारी रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१)-(ज ३) अन्वये संजय साडेगावकर यांचे ग्रा.पं. सदस्य अनर्ह ठरविले आहे. या निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपिल दाखल केले आहे.