तीन लाखांची रोकड हिसकावून चोरटे फरार
सेलू शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील घटना
सेलू/परभणी : एका जणाची तीन लाख रूपयांची रोकड पिशवीत घरी घेऊन जातांना, मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पिशवीच हिसकावून पळविली आणि चोरटे फरार झाले. गुरूवारी, ६ फेब्रुवारीरोजी दुपारी सेलू शहरात ही घटना घडली. या प्रकरणी देविदास जोगराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कृषी उत्पन बाजार समितीचे सेवानिवृत्त सहायक सचिव देविदास चव्हाण (वय ५९, रा. स्वामी विवेकानंद नगर, सेलू) हे भारतीय स्टेट बॅंकेतून काढलेली तीन लाख रूपये रोकडची पिशवी घेऊन दुपारी पावणे चारच्या सुमारास ऑटोरिक्षाने घराकडे निघाले. घरापासून काही अंतरावर उतरून हातात पिशवी घेऊन घराकडे जात असतांना, समोरून दोन अनोळखी व्यक्ती पल्सर गाडीवर फिर्यादीच्या जवळ आले व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळवून नेली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जीवन बेनिवाल, ऋषिकेश शिंदे, पाटील, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, प्रभाकर कवाळे आदींनी भेट दिली. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी करीत आहेत.