अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली
साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर
संमेलनात रंगणार दोन उद्घाटन सोहळे
मुंबई : दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात रंगणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पत्रिका संमेलन केवळ आठवड्याभरावर येऊनही लोकांपर्यंत न पोहोचल्याने संमेलनामध्ये सहभागी होणारे वक्ते, विषय याची नेमकी माहिती साहित्यरसिकांना मिळत नव्हती. सोमवारी काही कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पत्रिका जाहीर होण्यासाठी गुरुवार उजाडला.
संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी दोन सत्रांमध्ये होणार आहे. दुपारी ३.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवन येथे संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांना प्रवेश मिळेल. उद्घाटनच्या पहिल्या सत्रामध्ये स्वागताध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर उपस्थित असतील.
उद्घाटनाचे दुसरे सत्र तालकटोरा येथे होणार असून या सत्रासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे मराठी भाषामंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तसेच ९७व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे उपस्थित असतील. हे सत्र सायं. ६.३० वाजता सुरू होईल. संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सायं. ७.३० नंतर निमंत्रितांच्या कवी संमेलनाचा कार्यक्रम रंगेल. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये सकाळी १० वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मुलाखतीचा कार्यक्रम होईल. यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर सहभागी होणार आहेत. सोबत रवी पंडित, हणमंतराव गायकवाड असतील. तसेच साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के श्रीनिवासराव सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता मराठीचा अमराठी संसार हा कार्यक्रम होईल. त्यानंतर विशेष सन्मान, भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब हा कार्यक्रम होईल. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सभामंडपामध्ये दुपारी १२.३० वाजता बहुभाषिक काव्यसंमेलन होईल. दुपारी २.३० वाजता ‘आनंदी गोपाळ’ या विषयावर परिचर्चा, दुपारी ४ वाजता बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे साहित्य व जीवन हा परिसंवाद आणि सायं. ५.३० वाजता मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम पवार असून यात ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नागपूर आवृत्तीचे निवासीवासी संपादक श्रीपाद अपराजित सहभागी होणार आहेत. तसेच डॉ.अनिरुद्ध मोरे, अरुणा देशपांडे, संजय सोनवणी, प्रभाकर ओव्हाळ हेही यात सहभागी होतील.
संमेलनाच्या सांगता दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये सकाळी १० वाजता असे घडलो आम्ही चर्चासत्रात पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, डॉ. नीलम गो-हे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर चर्चा करतील. दुपारी १२ वाजता सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य परिसंवाद होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता नाते दिल्लीशी मराठीचे या परिसंवादात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भूषण राजे होळकर सहभागी होतील. अखेरच्या दिवशी यशवंतराव चव्हाण सभामंडपामध्ये सकाळी १० वाजता अनुवाद मराठीतून इतर भाषेत या विषयावर परिसंवाद होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा होईल. सांगतेच्या दिवशी दुपारी ४.३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोप सोहळ्याला सुरुवात होईल. समारोपासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
Courtesy : Maharashtra Times