विभागीय आयुक्तांचा निर्णयामुळे संजय साडेगावकरांना दिलासा
वालूर येथील अतिक्रमण प्रकरण; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास स्थगिती
सेलू : तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतचे सदस्य संजय साडेगावकर यांनी ग्रा.पं. क्षेत्रात स्वतःच्या मूळ जागेत शासकीय जागा ताब्यात घेत अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व अनर्ह ठरविण्यात येत असल्याचा निकाल ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला होता. मात्र संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्तांकडे ४ फेब्रुवारी रोजी दाखल अपिलावर १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांचे आदेशाला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय दिला.
सेलू तालुक्यातील वालूर ग्रा. पं. मधील सदस्य लिंबाजी कोपणवार, धारुजीधाबे, सतीश कलाल, चंद्रकांत चौधरी, गोरखनाथ भालेराव, नागरिक वाहेद खाँ पठाण, दादामिया कुरेशी या सदस्यांनी जिल्हाधिकारी याचेकडे यानी सरपंच संजय साडेगावकर व कुटुंबातील सदस्यांविरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार केली होती. परंतु, तक्रारदाराकडे पुरावे नसल्याने हा अर्ज निकाली काढण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदारांनी अप्पर विभागीय
आयुक्तांकडे अपिल केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा फेरचौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आले होते. या प्रकरणात प्राप्त अहवाल ग्राह्य धरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ३० जानेवारी रोजी संजय साडेगावकर याचे ग्रा.पं. सदस्य अनर्ह ठरविले होते. या निर्णयाविरोधात संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर याच्च्याकडे धाव घेतली होती.
या प्रकरणात १८ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी निर्णय दिला. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी उपअधिक्षक भूमि अभिलेख सेलू कार्यालयाकडून सदर जागेवर अतिक्रमण केले किंवा नाही याबाबत खातरजमा न करता आदेश निर्गमित केले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर जागेची मोजणी करुन अहवाल सादर करावा, असे सांगत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे याच्या आदेशाला स्थगित दिली. तसेच या प्रकरणात पुढील नियमित सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवण्यात यावी, असे आदेशात नमुद केले आहे. या निर्णयामुळे संजय साडेगावकरांना दिलासा मिळाला आहे.